आय डू नाॅट बिलाँग हिअर...



चित्र: सुनील यावलीकर


लहानपणीची माझी शाळकरी मैत्रीण जय्यू. तिच्या घरी ससे आणले होते पाळायला. पांढराशुभ्र कापूस गबदूल ढगांच्या फुगीर आकारात कोंबून भरावा तसे गलेलठ्ठ सौष्ठवाचे, गुंजेच्या लुकलुक केशरी डोळ्यांचे टूणूकटुणूक ससे. आणि मग आम्हा पोरीटोरींना काहीही निमित्त पुरायचे जय्यूच्या घरी जाऊन सशांशी मस्ती करत खेळायला. सशांसाठी चांगलं लांबरुंद मऊशार घर केलं होतं रहायला, आवडतं अन्न खायला आणि गारगार नितळशार पाणी प्यायला. पण आमची टोळधाड गेली की ते बिथरायचे. दोन्ही कान ताठ उभे टवकारत, पोटाशी पाय आक्रसून घेत पाठीचं उभट कोंडाळं करून एका जागेवर सावध थबकायचे. तेव्हा त्यांचे गुंजेचे केशर-डोळे जागच्याजागी भेदरून टुकटुकायचे आणि उभट वक्राकार पाठीवर सूक्ष्म थरथर जाणवायची. त्या थरथरीमुळे पिंजलेली शुभ्र केसाळ फर विजेच्या धक्क्यानं अचानक झंकारल्यासारखी तिथल्यातिथेच थरथरायची. आमच्या खोडकर टुकार टोळीला तेव्हा ते भेदरट से मोठे गमतीदार वाटायचे. हटकून आम्ही फेर धरून सभोवती उभे रहायचो. कोणी त्यांना डिवचायचं, कोणी इकडून-तिकडून हुसकायचं. सशे अवगुंठित झाले की आतल्या पोटाशी पाय ओढून जागीच थबकत, तेव्हा त्यांच्या पाठीची वक्राकार झंकृत थरथर अनुभवण्यासाठी आपला तळवा मुद्दाम त्यांच्या पाठीवर ठेवायचा. त्या धसमुसळ्या स्पर्शानं सशे आणखीच लटलट कापत आणि आपल्या तळव्यांना त्याच्या पाठीवरच्या शुभ्र केसाळ कातडीआतली थरथर जास्तच खोलखोल जाणवे. पाठीपासून थेट सशाच्या काळजापर्यंतचा कंप तळव्यात संक्रमित होई

 तो खेळ होता, की खोडसाळ डिवचणं होतं, की कशाचंतरी अभिसरण करून घेणं होतं स्वतःत, ठाऊक नाही... पण सशाच्या भित्रेपणाच्या गाणी-गोष्टी सांगत आम्ही तसा डाव मांडायचो. आवडायचं आम्हाला सशांना भिववायला. त्यांच्या पाठ-पोट-काळजातली थरथर गंमत म्हणून तळव्यांनी अनुभवायला. खोडसाळ नजरेचे अनेक कॅमेरे एकाचवेळी चहुबाजूंनी रोखून सशांचा नैसर्गिक अधिवास अडचणींचा करायला

 खरंतर पुढल्या दोन पायांनी लांब झेप घेत टुणूकटुणूक उड्या मारत बागडणाऱ्या या जिवंत कापसाच्या ढगाला अनुभवण्याएवढी निर्व्याज, निस्सीम, मुक्त, अवखळ गोष्ट निसर्गात दुसरी कुठलीच नाही. पण त्याऐवजी आम्ही कॅमेरे रोखून उत्सुक होतो त्यांच्या काळजातल्या भयकंपाचा बुजरेपणा टिपायला !


 तर, ही गोष्ट सशाची नाहीच. आणि नाहीय सशाच्या भेदरटपणाचीही. गोष्ट आहे, सशाच्या अवगुंठित वक्राकार पाठीवरच्या सूक्ष्म थरथरीची! ती थरथर तेव्हाच्या शाळकरी वयापासून चिटकूनच बसलीय तळव्यांना. सशे नाहीत आता, खोडसाळ पोरीटोरीही पांगल्या सगळ्या. पण हे काय आणि कशाचं अभिसरण होऊन बसलंय आपल्या तळव्यात! कळत नाही, उमजत नाही, पचत नाही आणि सोसवतही नाही

 सतत भास होतो, की हा भवताल कॅमेरे रोखून बसलाय आपल्या हरेक हालचालीवर. अडचणीचा करू पाहतोय आपला नैसर्गिक भवताल. अवरोध आणू पाहतोय आपल्या छोट्या छोट्या निस्सीम, निर्व्याज, मुक्त आविष्कारांवर. अष्टौप्रहर पाळत ठेवली जातेय आपल्या आतल्या कंपनांवर. काळजातल्या धडधडीवर आणि सूक्ष्मातीत थरथरीवर. नियंत्रित केले जातायंत आपले श्वास, उच्चार, चालणं, बोलणं, पेहराव, लकबी, लहेजा आणि लिहिणं

 समजा काही शब्द आहेत आपल्या बंद मुठीआत. ते खूप गच्च पकडून ठेवलेत आपण निसटून जाऊ नयेत म्हणून. आणि आपल्याला साकारायचंय त्यातून एखादं मनाजोगतं शब्दशिल्प. आपल्या मुठीतल्या ''पासून 'ज्ञ'पर्यंतच्या हरेक अक्षराचा कुठं कसा वापर करायचा हे ठरवण्याचा असायला हवाय अधिकार तसा पूर्णतः आपला आपल्याला. पण तसं होत नाही. कारण कॅमेरे रोखलेलेयंत आपल्यावर. आपण काढलेल्या कोणत्याही शब्दाचे निघू शकतात कसेही अन्वय याचं भान (नव्हे भीती !) असायला हवी आपल्याला. आपली पाठ व्हायलाच हवी सशाच्या अवगुंठित वक्राकार थरथरीची. घामेजायला हवेत भेदरलेले तळवे सूक्ष्म कंपानं. समजा चुकून काढलाच बंद मुठीतून एखादा मनाजोगता शब्द, तर आपल्या या हरकतीची, भवतालाचे कॅमेरे टिपतील ती प्रतिमा आपल्या मनातली असेलच असं नाही. समजा आपल्याला लिहायचं आहे नदीविषयी, तर कॅमेऱ्याला हवा असू शकतो तपशील तिच्या उगमाचा, ती कुठून कशी वाहिली त्या भूभागाच्या नकाशाचा, तंतोतंत रेखाटनाचा, अथवा जागोजागच्या बंधारे, पाणीवाटप यांच्या कराराच्या दस्तावेजांचा किंवा तिच्या उपनद्यांसह ती कोणत्या समुद्राला जाऊन मिळते त्या माहितीचाही. यापैकी एकाही बाबतीत गफलत झाली तर तो असू शकतो पूर्णतः आपलाच दोष. कारण आपण लिहू पहायतोय 'नदी'! मग एवढी जोखीम तर घ्यायलाच हवी बंद मुठीतल्या मनाजोगत्या शब्दांखातर. याशिवाय हीदेखील तयारी ठेवायला हवी की, लख्ख खुल्या आभाळाखालचं काहीही उच्चारलंत तरी केवळ एका शब्दावरून वर्गीकृत केलं जाऊ शकतं आपल्याला अमूकतमूक 'इझम' मध्ये

समजा, जर आपण लिहिणार असू तळागाळातल्या शोषितांविषयी, तर ठरू बहुजनवादी. बोलत असू भूक आणि भाकरीबद्दल तर आपल्यावर शिक्का पडेल साम्यवादाचा. चंद्र-चांदणी-बागा-प्रियकर-प्रेयसी विषयी लिहाल तर ठराल तद्दन रोमॅण्टिक वा टाकाऊ रंजनवादी. कला आणि बुद्धीच्या वरच्या पातळीवर जाऊन मांडणी कराल तर पांढरपेशा अभिजनवादाची झलक डोकावेल. आपण असू शकतो डावे किंवा उजवे. कारण याशिवाय तिसरी लेन्सच नसते कॅमेऱ्याला

 जर हे सगळं झिडकारून म्हणू आपण, की पुढच्या दोन पायांनी मुक्त लांब उडी घेत निर्व्याज निस्सीम बागडायचंय आपल्याला, तर मात्र खैर नाही. कारण एनकेन प्रकारे आपल्याला कोंबून-दडपून बसवलंच जाईल कोणत्या ना कोणत्या कप्प्यात

 नपेक्षा, मुठीतले सगळे ''पासून 'ज्ञ'पर्यंतचे शब्द तसेच गच्च मिटून निमूट थरथरत राहणं हा एकच असू शकतो यावरचा नामी उपाय

 पाय पोटाशी दुमडून आपल्याच काळजाची थरथर ऐकत आडवातिडवा विचार करून शब्दांच्या उगम, उत्पत्ती मालकीचा डोकं फुटेस्तोर विचार करकरूनही फार काही हाती लागणार नाहीच. निळ्याशार समुद्रावर शांत पहूडलेला प्रलयातीत शेषशय्यी विष्णू.. नाभीतून उमलेलं लवलवतं कमळ... ब्रह्मदेव... मूलध्वनी आणि मुलाक्षरांची उत्पत्ती... पण छे, असा विचार करू तर ठरू मनूवादी

 मग ज्ञाना, तुका? शब्दांचे खरे बाप तेच तर. त्यांच्याच नावावर जमा असतील सगळे सिद्धांत. पेटंट काढली असतील का त्यांनी शब्दांची, विचारांची आणि सैद्धातिंक मांडणीची? छे, छे, हा तर कार्पोरेट दृष्टिकोन आपला. भरकटतोयच पुन्हा आपण

 सगळंच बाद, तर मग तराजू तोलणारे हात कोणाचे? मापाचा बाप कोण? आहे तरी कोण मापातल्या पापाचा छद्मी सावकार

 शब्द सोडून दिले समजा, रंगाविषयी बोलू म्हटलं काही. असं समजा, की इंद्रधनुष्यातले सातही रंग आहेत तुमच्या मुठीत. तानापिहीनिपांजा. आणि रंगवायचं आहे तुम्हाला एखादं मनातलं चित्र. तर जो कोणता रंग निवडू इच्छिताय तुम्ही, तो आधीच विभागला गेला असेल वाटणीत. हिरवा निवडा,भगवा निवडा अथवा निवडा गहिरा निळा, निवडलेल्या रंगानुसार तुमचं चित्र आपसूक जाऊन पडेलच त्यात्या वाटणीच्या आडव्या-उभ्या कप्प्यात

 रंगाचं जाऊ दे, एखादी धुन, गाण्याच्या ओळीची लकेर किंवा आपसूक धरावा वाटेल असा पावलांचा ठेका...तोही नसेल आभाळातून पडणाऱ्या पावसाच्या थेंबाएवढा विशुद्ध ! मळावं लागेलंच, वाहावं लागेल, प्रवाहपतित व्हावं लागेलंच हरेक थेंबाला

 घामेजल्या तळव्यांची थरथर सांगते की, हा अधिवास परका आहे. टवाळ-खोडसाळांनी अधिक्रमित केलेला आहे. हेतूंची शुद्धता उपयोगाची नाही, विचारांचं नावीन्य चालणार नाहीच, भावनेची निस्सीमता टाकाऊ आहे. एवढंच फक्त पक्कं आहे की कात्री लागणार, कप्पे ठरणार

 ते डिवचतील. हटकतील. फेर धरून छेड काढतील. दटावतील, दरडावतील, गर्भित धमकी देतील, वगळायला लावतील, माघार आणि माफीसाठी 'ट्रोल' करतील. हायजॅक करतील सबंध यंत्रणा. दुखऱ्या नसा हुडकून वेठीला धरतील. मुजोर आणि बेईमान होत ताब्यात घेतील सत्तेचे सुकाणू. हुप्पे होऊन निर्विवाद कब्जा करतील रिवार्ड-सिस्टिमवर, आतून आणि बाहेरून. कंपूकंपूचा वावर असेल, कंपूंनाच ते देऊ पाहतील व्यक्तिमत्व. नाक्यानाक्यावर ठरवून केला जाईल आतल्यांचा जयघोष आणि बाहेरच्यांची छीथू . सजातीयांचे, सहेतुकांचे, सहसंबंधींचे अभेद्य कोंडाळे होतील. 'बसवलेल्यांची' सत्ता आणि मर्जीतल्यांची चलती असेल. 'गुणवत्ता' ही निकषबाह्य गोष्ट ठरेल. तेच ते कित्ते सरावाचे होत जातील आणि थोड्याच काळानंतर रोजमर्रा जगण्याची, जिंकण्याची (जिंकवण्याची !) हीच सहज-रीत बनून जाईल. अंगवळणीही पडेल व्यवस्थेच्या. निस्सीमतेचा अपभ्रंश हळूहळू नियम होऊन जाईल. निर्व्याजता दोष ठरेल. गुणवत्ता दुय्यम असेल

 असं खूप खूप... 

तेव्हा सशाचं लटलटतं काळीज तळहातावर घेऊन मनातून दुखावले जाऊ आपण आणि पुन्हा पुन्हा हेच वाटत राहील की, या खुल्या आभाळाखालचं, अथांग भुईवरचं काहीच तर नाहीय आपलं

 खरंतर हे शब्द आपले नाहीत. हे रंग आपले नाहीत. ताल, लय, ठेका, लकेर, फुलं आणि बागा, पाखरं आणि फुलपाखरं आपली नाहीत. आपल्याला शिकवली गेलेली भाषा, घोकून घेतलेल्या व्याख्या आणि बंद डोळ्यांनी हात जोडून म्हणवून घेतलेल्या प्रार्थना आपल्या नाहीत. मग आपलं कायेय, तर फक्त भेदरट सशाच्या अवगुंठित पाठीवरची वक्राकार थरथर तेवढी आपलीय. 'आय डू नाॅट बिलाँग हिअर...'  या धारणेतलं फक्त एकाकी वैफल्य तेवढं आपलं आहे!

Comments

  1. अतिशय समर्पक उदाहरण दिलसं सशाचं . ससा हे अभिरूपच म्हणाव लागेल . प्रत्येक जण च अनुभवत आहे या सर्व भय कंपीत संवेदना आणि त्या बाळगत जगण सरावाने आलंच . सगळ्या चौकटी वर्षानुवर्ष अगदी तश्शाच पुढे परंपरागत चालणारच जणू . वेगवेगळे वाद आणि त्यांची त्यासम चाकोरीबद्ध ठेवण यापलीकडे मात्र सामान्यांची घुसमट आणि फरफट फक्त न संपणारी .

    ReplyDelete
  2. अतिशय सुंदर शब्दरचना, अप्रतिम उदाहरण 👌👌

    ReplyDelete
  3. पावला पावलावर टपून बसलेत
    पारधि ,शब्दांची सूध्दा शिकार
    करण्यासाठी. शब्द न् शब्द खरा आहे
    मॅडम ,खूपच सजग मांडणी.

    ReplyDelete
  4. प्रामाणिक माणसाच्या अस्वस्थ जाणिवेचा अविष्कार ...अगदी तळातून व्यक्त झालात!!

    ReplyDelete
  5. अत्यंत तरल मनोवस्था दर्शवणारा व ससा, नदी आणि कॅमेरा या प्रतीकांतून व्यक्त झालेला भाव वाचकांच्या मनाची पकड घेतो. हे ललित असले तरी सार्थ शब्दांत आशय वाचकांपर्यंत पोहोचतो. शब्दधुमारे वाचकांना वास्तवाचा ठाव दाखवत राहतात. लालित्यपूर्ण भाषा असली तरी मुख्य आशय सरळ प्रतीत होतो. शब्दकळा, भावसौष्ठव परिस्थितीविषयी असलेली घुसमट सार्थ शब्दांतून समर्थपणे व्यक्त झाले आहेत... !
    शुभेच्छेसह...
    प्र. श्री. जाधव

    ReplyDelete
  6. This depicts the level of depression of contemporary youth and the overall present , which is truly unfortunate and demands profound thinking on the same.......

    ReplyDelete
  7. सहजतेने गुंता मांडलाय

    ReplyDelete
  8. आजघडीला सशाच्या गोष्टीचे उदाहरण मार्मिक आहे. यालेखातून स्त्रिया ची तळमळ दिसते . खूप सुंदर ,संग्रही ठेवण्यासारखा आहे.

    ReplyDelete
  9. सशाच्या प्रतिकातून आजच्या वाङ्मयीन पर्यावरणावरच नेमकं बोट ठेवलंय तुम्ही सुचिता . अत्यंत मर्मस्पर्शी लेख आहे हा . खूप आवडला .

    ReplyDelete
  10. भेदरट सशाच्या अवगुंठित पाठीवरची वक्राकार थरथर तेवढी आपलीय.

    हे एकूण उत्तम प्रतीचं ललितलेखन आहे. तरल तरीही वैचारिकतेची डूब असलेलं. अलीकडच्या काळात मराठीत असं लेखन दुर्मिळ आहे.


    ReplyDelete
  11. छानच...अप्रतिम

    ReplyDelete
  12. काय भारी लिहिता हो मॅडम.. अगदी नदीसारखं.. प्रवाही..

    ReplyDelete

Post a Comment