अनुराधाबाईंची कविता : मराठी भाषा जिवंत आहे तोवर या वह्या बुडीत खाती जाणे नाही !

'आता वह्या सगळ्या बुडीत खाती' हा कवयित्री अनुराधा पाटील यांचा साहित्य अकादेमी पुरस्कारोत्तर प्रकाशित झालेला नवा कवितासंग्रह. एकूण प्रकाशित संग्रहसंख्येच्या क्रमान्वये सहाव्या क्रमांकाचा व इ.सन १९८१ ते २०२२ या प्रदीर्घ कालावधीतील सुमारे ४०-४२ वर्षांच्या सातत्यपूर्ण लेखनप्रवासातला सर्वात अलीकडचा लेखन ऐवज!

वरील तपशील मुद्दाम उल्लेखिण्याचे कारण असे की, अनुराधा पाटील यांच्या कवितेवर काही बोलताना विशिष्ट संग्रह समोर ठेवून त्या एका पुस्तकापुरतेच बोलणे हा त्यांच्या वाङ्मयीन कर्तृत्वाचा संकोच करण्यासारखे असेल. म्हणून 'आता वह्या सगळ्या बुडीत खाती...' बद्दल बोलताना प्रामुख्याने दोन पैलूंना अधोरेखित करावे लागेल. एक, कवी म्हणून व्यक्तिगतरित्या दरनव्या संग्रहागणिक निरीक्षणास येणारी काव्यात्म व्यक्तिमत्त्वाची उत्क्रांती आणि दुसरे, त्या-त्या लेखनकाळात घडणाऱ्या भवतालाविषयी अभिव्यक्तीने नोंदवलेला सजग समकालीन हस्तक्षेप.
 'उत्क्रांती' ही जरी जैवशास्त्रीय परिभाषा असली तरी ती कलावंताच्या जाणीव नेणीवांचा पैस कसा विस्तारत जातो, त्याचे परिपक्व होत जाणारे आत्मभान क्रमशः कसे विश्वभानाकडे झुकत जाते याचा अभ्यास करण्यासाठी उपयुक्त आहे. बव्हंशी, समान पठडीत, समान आशय, समान धारणा आणि तेच ते तपशील घेऊन सबंध लेखनकाळ एकाच प्रसंगनाट्याभोवती आपली कविता गिरवत राहणारे कवी मराठीत अनेक आहेत. दुर्दैवाने असे अनेकजण लोकप्रिय व आघाडीचे म्हणूनही मान्यता पावलेले दिसतात. परंतु कोणत्याही कलावंतासाठी त्याचे कलाविष्करण व्यक्तिगत जाणिवांच्या आणि काळाच्या पटावर, अशा दुहेरीपणे क्रमशः पुरेसे उत्क्रांत होत गेलेले नसेल, तर सार्वभौम असे विश्वभान व्यक्त होण्यासाठी आवश्यक विविधांगी चौफेर आकलन त्या कलावंतात रुजले नाही असेच म्हणावे लागेल. मर्यादित मूलद्रव्य, मर्यादित अवकाशात सार्वकालिक वापरून उदंड लेखनमजकूर प्रसवता येईलही, पण वाङ्मयाचे सर्वोच्च असे कालातीत मानदंड त्याला लागू होणार नाहीत.
विशिष्ट काळात लिहिल्या गेलेली कविता ही त्या त्या वर्तमानाचा ऐतिहासिक दस्तावेज असते. भविष्यात जर तो विशिष्ट काळ त्या कवीच्या व्यक्तिगत आयुष्यासंदर्भात किंवा सार्वजनिक घडामोडींसंदर्भात जाणून घ्यायचा झाला तर तेव्हा कवितेत डोकावणे पुरेसे ठरावे इतकी ती तथ्यनिष्ठ व सत्वत्निष्ठ असावी. खूप काळापूर्वी जमिनीआत गाडलेले आणि दबावामुळे काळे पडलेले मातीखालचे कोळसासदृश्य जीवाश्म उकरून गतकाळातील जैविक इतिहास अचूक हुडकून काढता यावा, तसं या जीवाश्मासारखेच कवितेचे बोल असे असावेत की खूप खूप वर्षांनंतरही समकाळाची जनुकं त्यात नेमकेपणानं गवसावीत. खरं तर गतकाळाचा सांस्कृतिक, सामाजिक इतिहास शोधण्याची ही कसोटी आहे, ती अमूकतमूक कवितेला लागू होत नसेल तर तशी कविता फक्त मनोरंजन करू शकते, प्रायोगिकता साधू शकते, पण वर्तमानात हस्तक्षेप करण्याची क्षमता त्या ओळींत नसते.
     या सगळ्या निकषांवर बाईंच्या कवितेच्या बाबतीत त्यांचे आधीचे संग्रह जाणिवांच्या विस्तारित आलेखाच्या रूपात अवलोकित करणं ही बाब कवितेचा अभ्यासक म्हणून खूप रोचक आहे.
           'समग्र अनुराधा पाटील' हा या लेखाचा विषय नाहीय, तरीही 'आता सगळ्या वह्यांबद्दल' सांगताना बाईंच्या कवितेच्या समग्रतेचा धागा सोडून देत सुरुवात नाही करता येणार. 'दिगंत'पासून सुरू झालेली ही आर्त जाणीव '...तरीही' , 'दिवसेंदिवस' मधे अधिक तीव्र, नेमकी होत जाते आणि 'वाळूच्या पात्रात मांडलेला खेळ' मध्ये ती आत्मभान व विश्वभान या दोन्हींच्या जोडीने व्यापक होत 'कदाचित अजूनही' मधे ही विश्वात्म सार्वभौमता समष्टीला कवेत घेताना आपला पैस आणखी रुंदावते.
काळासोबत चालण्याची आणि विपर्यस्ताला प्रश्नांकित करण्याची ही खुबी या कवितेला आवाहकतेच्या कसोटीवर टिकाव धरण्याचे सातत्य आणि उच्च काव्यात्म गुणवत्ता बहाल करत जाते.
काव्यात्म उत्क्रांतीचा हा प्रवास 'आता वह्या सगळ्या बुडीत खाती...' या कवितासंग्रहात अनेक अर्थाने बाईंच्या कवितेच्या चाहत्यांना धक्का देणारा ठरला आहे. संग्रहात गवसणारी ही अनपेक्षित वैशिष्ट्ये हटकून वापरलेली धक्कातंत्रे नाहीत, तर 'दिगंत'पासून सुरू झालेल्या कवितेच्या उत्क्रांतीचा तो एक निर्णायक व उच्च आविष्करणाचा टप्पा आहे.
ही वैशिष्ट्ये समजून घेण्यासाठी वाचकाने कवितेच्या रूढ समीक्षेला फाटा देऊन वर्तमान अरण्यकाळाचा एक धगधगता दस्तावेज म्हणून या संग्रहाकडे बघणे प्रस्तुत ठरेल. विद्यापीठीय काव्यसमीक्षेत चाकोरीबद्धपणे वापरली जाणारी भाषिक वैशिष्ट्ये, रचनासूत्रे, प्रयोगतंत्रे, प्रतिमा-प्रतीकं-मिथकं या पारिभाषिक बाबी थोडं बाजूला ठेऊन अनुराधाबाईंची कविता त्यातील सातत्य आणि बदल या दोन्ही सूत्रांना केंद्रस्थानी ठेवत धाडस, परखडपणा, सांस्कृतिक-राजकीय-सामाजिक अराजकाची, आघातांची सूक्ष्म जाणीव यासह एका विस्तृत अवकाशाला कवेत घेते, तेव्हा तो फक्त भाषाव्यवहार न राहता एका प्रतीकात्मक कृतीचे रूप कसे धारण करतो ते पाहणे महत्त्वाचे आहे.
     या संग्रहातील कवितेची अशी कोणती वैशिष्ट्ये आहेत, की ती या भाषाव्यवहाराला साहित्यिक कलाकृतीपुरते सीमित न ठेवता एक दैनंदिन जीवनव्यवहार म्हणून आपल्या काळाची व भवतालातल्या आपलीही लख्ख आरशासमोर उभं राहून चाचपडणी करायला भाग पाडतात. ही उकल करताना काही महत्त्वाची निरीक्षणं समोर येतात.
संग्रहाची ढोबळमानाने दोन भागात विभागणी करता येईल, पहिल्या भागात राजकीय जाणिवांच्या कविता आणि दुसऱ्या भागात कोरोना काळातील व इतर व्यक्तिगत भावसंवेदन उजागर करणाऱ्या कविता आहेत.
     अनुराधाबाईंच्या या संग्रहातील कवितेचं सर्वात महत्त्वाचं व लक्षणीय वैशिष्ट्य हे आहे की, ही कविता टोकाची 'पाॅलिटिकली इनकरेक्ट' कविता आहे !
हेच वैशिष्ट्य या संग्रहाला अधिक समकालीन, बंडखोर, तीव्र बुद्धिगामी, चिंतननिष्ठ, तथाकथित स्त्रीवादी कवितेपासून पूर्णतः भिन्न बनवते.
     ज्ञानसत्तेनं राजसत्तेला प्रश्नांकित करणं, चुकीच्या गोष्टींसाठी जाब विचारणं हेच कवीचं काम आहे, यात नवीन काहीच नाही. पण 'आता वह्या...' मधे बाई हा प्रश्न खूपच थेटपणे विचारतात, हे यातील अनेक कवितांवरून दिसतं. कवितांची शीर्षकं, त्यातील वक्रोक्ती, धाडसी पर्दाफाश अशा कैक जागा वर्तमानकालीन सत्ताव्यवहारातील मूक दमनाला उच्चारक्षम बनवतात.
असे टोकदार होताना याआधीच्या संग्रहातून हळूवार संयतपणे व्यक्त झालेल्या या भावविभोर व तरल कवयित्रीला आपली भाषा जरा जास्त उग्र होतेय याची पुरेपूर जाणीवही असते, तरीही ती मूल्यांचे राजकारण खेळणाऱ्या सत्तावर्गीय अभिजनांना त्यांची राजकीय चलाखी धीटपणे दाखवून देत मोकळ्या रानवाऱ्यावर युद्ध-ललकारीचा जाहीर एल्गार पुकारते.
संवेदनेचे हे बदलते रूप कवयित्रीच्याच ओळीत वाचणे आणखी रोमांचकारी आहे, त्या लिहितात,
" कोवळ्या तरल शब्दांची मिजास भिरकावून /
 अचानक उग्र वासाच्या / काटेरी जंगलात / शिरेल माझी कविता / आणि भोवतालाचा / दांभिक मुखवटा फाडून / माझ्यासकट / देईल नजरेला नजर / निखळ निर्भय... "
ही कविता सतत भोवताली दाटून असणाऱ्या भयाबद्दल निरंतर बोलते. पण तेव्हा ती मुळीच पराभूत, हताश नसते तर या भयाच्या भ्रमाचा भोपळा तिला फोडायचा असतो. सत्तेच्या तालावर नाचणाऱ्या आंधळ्या-बहिऱ्या स्वार्थसाधू भक्तांना आतल्या पोकळतेचं दर्शन घडवून भयमुक्त करायचं असतं.
'या टोकापासून' शीर्षकाच्या कवितेत त्या लिहितात ,
"आदिम गुहेत शिरताना / उतरवले त्यांनी / आपले कपडे, बूट आणि पट्टे / आत काहीच नव्हतं / बुजगावण्याखेरीज.../ मग भय नेमकं कशाचं होतं / भोवतालात दाटलेलं ?"
नव्यानव्या नंदीबैलांचा लाचार कासरा फिरवणारे मुठभर मस्तवाल एकीकडे आणि अत्याचाराने भयकंपित वळ उमटलेले बहुसंख्य शोषक दुसरीकडे, अशा दुहेरी शोषक-शोषितांचे एक वास्तवदर्शी चित्र ही कविता उभी करते.
'संसदेच्या आरशात ' या उपरोधात्मक कवितेत, सत्ताधारी आणि विरोधक यांच्यातील जनतेच्या प्रश्नांसंदर्भातील सांसदीय कामकाज, ऐरणीवरच्या समस्या यांना अतिशय कडवट उपहासाने मांडताना कवयित्री सामान्य जनतेच्या मनातले अनेक पदर सहज उकलत नेत, सर्वात मोठी लोकशाही असणाऱ्या देशातील सर्वोच्च लोकभवनाप्रति सामान्य माणसाची अपेक्षा व अपेक्षाभंग यासंदर्भातील दोन्ही वेदना वक्रोक्तीपूर्ण पद्धतीने मांडते.
'बुलडोझर'सारखी कविता विकासाच्या नावाखाली दाबून टाकलेला हक्काचा आवाज व सर्वसामान्यांच्या मनातली अहोरात्र दहशत व्यक्त करते. अतिक्रमणाच्या कारणावरून रातोरात बेघर होणारे उद्ध्वस्त उंबरठे, बाटलीतल्या छुप्या राक्षसासारखा बेबंद भयाचा अहर्निश धुडगुस व्यक्त करताना अनुराधाबाई लिहितात,
 "दंगल भडकावण्याचा आरोप करता येतो त्याला / एखाद्याचा आवाज बंद करून / आणि काढता येते विकासाची नवी ब्ल्यू प्रिंट / राजमान्यतेची मोहर लागलेली"
'मतदान : एक अधिकार' या कवितेत त्या म्हणतात,
 "कुणी खांद्यावर हात ठेवला / तर खुशालणारी / औकात आमची /पण तुमची जात भाऊ / कांद्याच्या वाणाची / कापला तर रडवतो /आणि सोलावा तर नुसताच / पापुद्र्यामागून पापुद्रा / तळापर्यंत"
अशा ओळी मतदानप्रक्रियेचं व संवैधानिक मूल्यांचं लोभापायी केलं जाणारं विद्रुपीकरण अचूकपणे रेखाटण्यात यशस्वी ठरतात.
'नव्या स्वातंत्र्याची गोष्ट' या कवितेत सरकारी कागदपत्रात केवळ अडथळा म्हणून नोंद असणाऱ्या फाटक्या माणसांचं इतरांनी मेहरबानी म्हणून बहाल केलेलं आणि भवतालच्या चिमूटभर उजेडालाही पांगळं करणारं काळवंडलेलं, श्वासापुरतं उरलेलं तोकडं स्वातंत्र्यही कसं गोठवलं जातं हे सांगताना त्या लिहितात,
"मात्र गोष्टीतल्या आटपाट नगरात / उगवत असतो त्यावेळी / छप्पन इंच छातीच्या योद्ध्यांनी ओढून आणलेला सूर्य / लाल किल्ल्याच्या / धगधगत्या भींतीवरचा इतिहास पुसून टाकणारा / जिथं ते वठवतात / प्रेषिताची हातखंडा भूमिका / विचार करण्याचं इतरांचं / संशयास्पद स्वातंत्र्य / गहाळ करून"
'नोंदवही' या कवितेत,
" ते जाळतात तुमचं पिढीजात खांडववन"
किंवा
"की तुम्ही असता त्यांच्यासाठी / गृहीत धरलेली अनंत शक्यता"
अशा ओळी लोकशाही आतल्या सामान्य माणसाच्या भाकरीचा आणि किमान भयमुक्त जगण्याचा प्रश्न धीटपणे उपस्थित करतात.
वाडःमयीन स्वातंत्र्य, अभिव्यक्तीची गळचेपी वगैरे तर खूप नंतरच्या बाबी झाल्या, पण इथे हात घातलेले प्रश्न गालफाडं खोल गेलेल्या, फाटक्या, तंगलेल्या, गांजलेल्या सामान्य माणसांचे आहेत. हे प्रश्न आणि ही माणसं खूप मूलभूत आहेत तरीही हा माणूस रांगेतला शेवटाचा माणूस आहे, ज्याच्यापर्य॔त संवैधानिक मूल्ये अजूनही पोचलीच नाहीत असे कवयित्री वारंवार सांगते. हा अभाव, ही दहशत, हे भय आणि ते सहन करणारी माणसं अराजकाच्या विषण्ण काळात कसाबसा तग धरताना थकून गेली आहेत, तरी कागदाला कान लावून काळजातल्या शब्दांचे आर्त ऐकू येईल म्हणुन नव्या पहाटेची आशाळभूतपणे वाट पाहणारी ती चिवट, जिवट आहेत. अशा स्वातंत्र्य हिरावलेल्या लोकांसाठी कवयित्री अथक लिहित जाते, त्यामुळे ही कविता आत्मविन्मुख होत नाही की दुभंग व्यक्तिमत्त्वाचीही होत नाही, तिचा स्वर पुरेसा समाजोन्मुख व मानवी वास्तवाचे मानवीय दर्शन घडवणारा आपसूक होत जाताना दिसतो.
     पहिल्या विभागातील एकूणच राजकीय विसंगतीवर बोट ठेवणाऱ्या कविता त्यामुळेच वर्तमानकालीन समग्र मानवी परिस्थिती व्यक्त करणाऱ्या ठरतात. जे काव्य वर्तमान पुरेशा वस्तुनिष्ठपणे उभारण्याला सक्षम असतं, ते काव्य फक्त एक साहित्यिक दस्तावेज नसतो तर त्या समग्र काळाचेच ते दर्शन असतं. हे दर्शन घडवून आणताना बाईंची कविता भावनिक संतुलन राखते, भक्कम तटस्थता ठेवत मूल्यांचे राजकारण उजागर करताना अनागोंदीच्या अरण्यकाळातही ती प्रगल्भ भाष्यकाराप्रमाणे संवैधानिक नैतिकता पुन्हा पुन्हा अधोरेखित करत जाते. कोणत्याही काळात कवितेचं काम कसं चालतं किंबहुना ते कसं असावं याचा आदर्श वस्तुपाठ या कवितांतून स्पष्ट होत जातो. मानवी व्यवहाराची संवेदना ओळखणं, ती त्यातील नैसर्गिक सहजभाव व अनैसर्गिक उपरोधासह व्यक्त करता येणं आणि तिचा समाजजीवनावर पुरेसा प्रभाव सोडता येणं ही साधारणपणे कुठल्याही सार्वकालिक कवितेची वैशिष्ट्ये सांगता येतील. या संग्रहात कवयित्री तथाकथित आधुनिकोत्तर काळात उत्क्रमणाच्या आडून होणारी विविध प्रकारची अतिक्रमणं उघड करताना विकासशील राष्ट्रातील लोकशाही प्रक्रिया पूर्णत्वाऐवजी गोठून जाण्याकडे अथवा मनाजोगती वळती करण्याकडे तर मुठभरांचा कल नाहीय ना, अशा अनेक छुप्या शक्यतांची उजळणी घडवून आणते.
     या सर्वथा 'पाॅलिटिकली अनकरेक्ट' कवितांच्या अनुषंगांने मुद्दाम आणखी एक नोंद घ्यावीशी वाटते की, या संग्रहाची कवयित्री ही कोणी नोकरदार, राजकारणी, उद्योजक, पत्रकार, समाजातील एखादे संवैधानिक पद भूषवणारी, अमुकतमुक चळवळीचा झेंडा घेऊन उभारलेली अथवा कोणी विद्यापीठीय प्राध्यापिका वगैरेही नाहीय, तर ती एक गावखेड्यातून आलेली-वाढलेली मध्यमवर्गीय गृहिणी आहे. अशी कवयित्री जेव्हा एवढे टोकदार भाष्य करत एकूणच सांस्कृतिक प्रदूषणाबाबत लिहिते तेव्हा तो आवाज सामान्य माणसाचा प्रातिनिधिक आवाज असतो, तो कोणत्याच आवरणाशिवाय मूळचा पिळवटा घेऊन आतून निघालेला त्या मानवी परिस्थितीचाच एकक परिमाण म्हणावा असा मूलभूत स्वर असतो. हितसंबंधविरहित, भयमुक्त, झुकावरहित असा हा आवाज जर एखाद्या अरण्यकाळाची नांदी नोंदवत असेल तर ते काव्य फक्त पारिभाषिक समीक्षापर चारदोन लेख लिहून अथवा काहीएक महत्त्वाच्या प्रशस्त्या-पुरस्कार प्रदान करून बोळवण करण्याजोगे नक्कीच नसते.
     कोणत्याही कवितेचे सार्वकालिक मानदंड ठरवताना 'काळ' आणि 'आशय' ही महत्त्वाची परिमाणं मानायची ठरवली तर अनुराधाबाईंचा हा संग्रह काळ आणि आशय दोन्हीच्या कसोटीवर व्यक्तिगत व समाजभानाच्या संदर्भात जी विकसनशील जाणीव स्वतःसह वाचकाला घडवून आणतो ती लक्षात घ्यायला हवी.
      सर्वसाधारणपणे अशा राजकीय किंवा सामाजिक विरोधाभास व्यक्त करणाऱ्या कविता अनावश्यक तपशीलवजा, निवेदनपर, पसरट, विसविशीत, सैल होताना दिसतात. त्यामुळे त्यातील काव्यात्म जिवंतपणा बोथट होऊन अशा वर्णनपर कवितांतून कवी फक्त एका प्रदीर्घ गद्यात्म भाषणबाजीचा सोस पूर्ण करून घेताना दिसतो. प्रसंगनिष्ठ चिकित्सा करण्याचा मोह आवरता आला नाही तर निबंधवजा शब्दकळा नाहक वक्तृत्वबाज होत भाषेतला जिवंतपणा मारून टाकते.
इथे, आजवर तरल संवेदनशील अल्पाक्षरी भावकविता लिहिणारी कवयित्री म्हणून वैशिष्ट्ये असणाऱ्या अनुराधाबाईंनी राजकीय व सामाजिक भाष्य करणाऱ्या या भिन्न स्वभावधर्माच्या कवितांमधेसुद्धा आपली अभिजात तरलता आणि शब्दांचा मितव्ययी टोकदारपणा वक्रोक्तीमध्येही टिकवून ठेवला आहे, हे विशेष.
     स्वतःच्या काळाकडे डोळसपणे पाहताना ही कविता चिंतनशील आत्मस्थिती व सामाजिक बहिर्मुखता अत्यंत प्रगल्भपणे संतुलित ठेवताना दिसते. प्रसंगनिष्ठ वर्णनपरता टाळून ती एका मध्यवर्ती संवेदनस्वभावाभोवती आपली घट्ट गुंफण उभारत नेते. म्हणून वर्तमानकालीन जीवनानुभव, समस्या, पीडा, श्रद्धा, दांभिकता व्यक्त करतानाही ती एक तर्कनिष्ठ वैचारिक शिस्त बाळगून असते. तरीही ही कविता असे परखड राजकीय भाष्य करतानाही जीवनापासून तुटक होताना दिसत नाही. म्हणूनच सुबोधता व उत्कटता ही त्यांच्या कवितेची आरंभापासूनची वैशिष्ट्ये इथेही त्या यशस्वीपणे कायम राखतात. अनुराधाबाईंची तरल भावनिष्ठ कविता राजकीय व सामाजिक आकारमान तोलतानाही तिच्यातल्या काव्यात्मकतेचा बळी जाऊ देत नाही. हा गुणधर्मच या कवितेतले 'लक्षात घेण्यायोग्य सातत्य' आणि 'वाखाणण्याजोगा बदल' म्हणून नोंद घेण्यासारखे महत्त्वपूर्ण वैशिष्ट्य आहे.
      दुसऱ्या विभागांतर्गत कोरोनाकाळातील कवितांमधून पुन्हा आपल्याला आतलं काळीज पिळवटून शब्दांना वेदनेची जिवंत वेणा बहाल करणाऱ्या अतितरल अनुराधाबाई जाणवतात. या कवितांमधे कोरोनाकाळातील ही अनिश्चितता फक्त व्यक्तिगत पातळीवर व्यक्त होत नाही तर एकूणच मानवी स्वभावात झालेले आश्चर्यकारक बदल, त्यातील तुसडेपणा, स्वार्थप्रणित, स्वकेंद्री, सुरक्षित व्यवहार या सगळ्यांची नोंद या कविता घेतात.
"मृत्यूच्या समान धाग्यानं / बांधली गेलेली / माणसं बसून आहेत / अनियमित होणारे / छातीचे ठोके ऐकत / आंधळ्याच्या गायी राखून / थकून गेलेल्या देवाच्या वाटेवर / फक्त डोळे उघडेच आहेत / इलाज नसलेले / आणि त्यांना दूर लोटता येत नाहीय / दाही दिशांतून / अंगावर कोसळणारं / अनावर पोरकेपण / त्वचेसारखं चिकटलेलं /या बेबस जगण्याला"
'क्वारंटाइन', 'मी पडून आहे इथं', 'लाॅकडाऊन', 'एवढं करा', 'भास' अशा अनेक कविता अंगावर काटा आणणारं, कोरोनाकाळात जगलेलं भीषण वास्तव चलचित्रासारखं आपल्यासमोर उभं करतात.
या कविता काळाच्या एका विशिष्ट तुकड्यातील भयावहतेचे दर्शन घडवताना प्रगत समाजातल्या माणसांचं असहिष्णू, मागास, अविकसित, कोतं रूप दाखवतात.
"सगळी दारं बंद आहेत / इथून तिथून / कुलुपबंद आहे देवाचंही दार"
"अख्ख्या जगाला येतोय / तितरबितर करणारा / मरणाचा वास / वरच्या बापानं धाडलेला / आणि किल्ली हरवलेल्था बेड्या / खोलता येत नाहीयेत / आमच्या हातीपायी पडलेल्या"
अशी उपहासात्मक हतबलता व्यक्त करणाऱ्या या ओळी मरणासन्न सार्वभौमातही कवीचं काम चोख बजावायचं विसरत नाहीत.
     वैश्विक जैविक संकटानं ग्रासलेल्या मानवी प्रजातीसमोर कधी नव्हे तो स्थलांतराचे, विस्थापितांचे, निर्वासितांचे असंख्य प्रश्न निर्माण झाले. मुंग्यांसारखे लोंढेच्या लोंढे चतकोर भाकरीविना मैलोनमैल अनवाणी चालत होते.
या तुकड्यातली ही भीषणता पुढे कोरोनोत्तर कवितांमधील जाणिवांमधूनदेखील डोकावताना दिसते.
'नकार' या कवितेत त्या लिहितात, "पुरत नाहीत आजकाल / नुसती कवी असण्याची ऊब / आणि मुलीनं / चित्रात रंगवलेला / फाटका माणूस / येतच नाहीय कागदाच्याबाहेर / ज्याच्यासमोर उघडता येईल / आपली रिकामी मूठ... मुलगी विचारतेय स्वतःलाच / निर्वासितांच्या छावणीत / जन्माला आलेली मुलं / कुठल्या देशाची असतात / कुणाची बोलतात भाषा / जी कळत नाही / छत्रंचामरं घेऊन फिरणाऱ्या / फिरंग्यांना"
या ओळी निर्वासितांच्या छावणीत जन्मलेली मुलं, त्यांची भाषा, नागरिकत्व यासंबंधीचे प्रश्न विचारतात, छत्रचामरं आणि फिरंगी मस्तवालपणाबद्दलही बोलतात. अशा काळात एक लिहिता माणूस म्हणून स्वतःचं कागदापुरतचं सीमित कवित्व पुरेसं नसल्याची खंतही कवयित्री जाहीरपणे उजागर करते. एक बेबस कवी म्हणून आपल्या मर्यादांचं न्यूनत्व व्यक्त करण्याचा हा दिलदारपणादेखील काळाच्या हतबलतेची नोंद म्हणून तंतोतंत वास्तवदर्शी चित्र उभारण्याला पोषक ठरतो.
     प्रेम,स्वप्नं आणि प्रार्थना सोबत घेऊन अर्धवट खेळातूनच पायही न वाजवता माघारी निघून जाणाऱ्या, लेखणी व शाईची गाठही न पडलेल्या गावातल्या मागे सुटलेल्या अशिक्षित पोरीबाळींबद्दल अनुराधा पाटील यांची कविता सातत्याने बोलत आली आहे. बाईचं हे मुकाटपण मांडताना कधीच आवाजी, आततायी न होणं हा त्यांच्या स्त्रीवादी कवितेचा विशेष आहे.
"बाई आणि जमीन /हक्कानं मिळणं / हा अधिकार समजणारांच्या जगात / त्या होतात कुणासाठीतरी / रंग विटलेली चादर / हवी तेव्हा पांघरूण / नको तेव्हा /लाथाडली जाणारी / होतात घर अंगण दोर खुंटी / आणि पाहतात मुकाट / घरातल्या आरशामागे / घरटं बांधणाऱ्या चिमणीला / हुसकावून दिलं जाताना"
'त्या होतात', 'खांब धरून चालताना', 'नकार', 'रुक्मिणी', 'आत्महत्या: एक बातमी' अशा निखळ स्त्रीवादी जाणिवांच्या मोजक्याच कविता या संग्रहात आल्या आहेत.
'रुक्मिणी' या नितांतसुंदर कवितेच्या आरंभाच्या ओळी अशा आहेत,
"कवड्यांचा डाव उधळत /तुझ्या वाट्याला आलं / जन्माचं एकटेपण / आणि विसरलीस तू / मुक्तीची मुळाक्षरं"
तर या कवितेचा शेवट असा आहे,
" विसर / त्याच्या छातीवर रुळणारी / तुळशीमाळ / तुझं त्रिखंड व्यापणारी / तुझं सुख तुझं दुःख / तुझी माती तुझी कूस / बये सोड निर्मळ / चंद्रभागेच्या पात्रात / आणि ओलांड आता / तुझ्या दिंडोरी वनाची वेस / अखेरची"
बाईच्या भरोशावर टेकलेलं पुरुषाचं देवपण मागे टाकून आपल्या सुखदुःखासह एकटेपणाची वेस ओलांडून एका नव्याच मुक्तीची वाट पूर्णतः स्वतःच्या सामर्थ्यावर रेघायला त्या साक्षात पांडुरंगाच्या रुक्मिणीलाच सूचवतात, जेणेकरून पुरुषाचं बाईला सतत गृहीत धरणं कायमचं संपेल.
     माणूसपणाची निखळ गोष्ट सांगणारी ही कविता या ना त्या प्रकारे दमनाच्या, शोषणाच्या नाना तऱ्हांविषयी, जगण्यानं केलेल्या अथक फरपटीविषयी, भ्रमनिरासाविषयी लिहिते.
"पण उखळात डोकं घालावं लागणाऱ्या / माणसांची गोष्ट तर चालतच आलीय ना पिढी दर पिढी / जिथं सांगता येईलच / आपल्याला आपला हक्क / बेजुबान उखळावर / टाचा घासायला लावणाऱ्या / या जगण्याचे / परतीचे दोर कापून / वहिवाटीची बूज राखत"
'रस्ते', 'भोवताल', 'पुरावा', 'स्थलांतर', 'आलेख', 'जाहिराती', 'आकांत', 'अंगठा आणि जीभ' अशा अनेक कविता भूक आणि भाकरीबद्दल, उपेक्षा आणि अवहेलनेविषयी बोलतात, तेव्हा ते काव्यसंवेदन काळाच्या सर्वव्यापी जाणिवेला व आकलनाला खोल परिमाण देत जातं. त्याचं कारण असं की,
अन्याय अत्याचाराविषयी लिहिताना अनुराधाबाईंची कविता कधीच तांत्रिक व सरावलेल्या कारागिरीची होत नाही तर या कवितेची एकूणच संघटना उत्कट माणूसपणाचा प्रत्यय देणारी आहे.
"भाकरीएवढं चवदार काहीच नसतं / अख्ख्या जगात / पण कल्पनेच्या म्हाताऱ्या / उडतात / दिशाहीन त्याच्याभोवती / आणि झांजा वाजवत / मोडीत काढला जातो / स्वतःचा एवढासा सवतासुभा / श्वास घेण्याच्या हक्कासह / बुडीत व्यवहार म्हणून"
     अभिजन संस्कृतीच्या सत्ताकेंद्रांवर हल्ला चढवणारी व बहुजनांच्या निरंतर कळवळ्याची भाषा बोलणारी ही कविता थेट तुकारामाच्या जातकुळीतली भासते.
"पांघरता येईल आध्यात्माची घोंगडी / खाता येईल भाकरी / आध्यात्माचीच /तोडता येतील पाश वेढणाऱ्या / भवपाशाचे / जे जवळ आहे / तेही आपलं नाहीय / अशा उदास विचारानं व्यय करता करता"
मुळातच कवयित्रीच्या व्यक्त होण्यातला संयत स्वर, नैतिक मूल्याग्रहाची आवाहकता, लोकपरंपरा व संतपरंपरेतील प्रतिमांचा, मिथकांचा वापर, मराठी जनमानसाचे व कष्टकरी बहुजनांचे आराध्य असणारा पंढरीचा पांडुरंग अशा बाबी या कवितेत सातत्याने येत राहतात. त्यामुळे अगदी आरंभाच्या संग्रहांपासूनच अनुराधा पाटील यांच्या कवितेचा बाज व संवेदनस्वभाव बव्हंशी आध्यात्मिक जाणिवांचा राहिला आहे.
माणूसपणाची नितांत कणव व जीवनमूल्यांविषयीची गाढ आस्था यांच्याशी बांधील असणारी ही कविता कधीच वरवरची, करमणूकप्रधान, मंचीय व टाळ्याखाऊ झाली नाही.
 "खरंतर श्वास घेणारा / प्रत्येक जीव इथलाच आहे / हे साधं सांगणंसुद्धा / निरर्थक आहे / जोपर्यंत रेषा आखणारांना विस्तारता येणार नाही / स्वतःलाच झाडासारखं / आणि होणार नाहीत मोकळे / त्यांचे छातीवर बांधलेले हात / आभाळाच्या दिशेनं / करुणेला कवेत घेण्यासाठी"
अशा अनेक जागा सापडणाऱ्या या कविता फक्त कवितेपुरतंच लेखी नैतिक विधान करत नाहीत तर त्या विश्वकारुणिकाच्या सहृद्य प्रार्थनाच होऊन जातात. हा फक्त कवितेच्या ओळीतल्या शब्दांचा पसारा उरत नाही, तर विशाल मानव्यभावाला कवेत घेण्याची ती एक महत्तम कृतीच ठरत जाते.
आध्यात्मिक जाणिवेची वाटता वाटताच प्रस्तुत संग्रहातली कविता कधीकधी शोषणाच्या द्विध्रुवी तऱ्हेची कथा सांगणारी भांडवलदारविरोधी व मार्क्सवादीही भासू लागते.
"जेवढं काही जवळ आहे / आपलं म्हणून / तेही द्यायचंय एक दिवस / अदानी अंबानी यांना हे लक्षात घेतलं तर सोप्या होतील अनेक गोष्टी "
घर पाठीवर घेऊन फिरणारे अर्धपोटी जथ्ये आणि कायद्याचं राज्य फायद्यात चालवणारे छत्रचामरधारी धनदांडगे, ही विषमता या संग्रहात राजकीय, सामाजिक व आर्थिक दरीच्या रूपात वारंवार व्यक्त झाली आहे.
तर 'एक हट्टी म्हातारा' या कवितेत ती अहिंसावादी, गांधीवादी भाषा बोलते, " तू कातायचास / त्या सुतासारखा चिवट तू / तू उरशीलच इथल्या मातीत / पुन्हा पुन्हा उगवून येत / आणि चालत राहशील /काठी टेकत देशाच्या नकाशावर / आमच्या अस्तित्वाला बिलगलेले माणूसपणाचे काही कण / उजळून टाकत / या सर्वभक्ष्यी काळोखात"
सकृतदर्शनी असे वाटले तरीही मूल्यसंभ्रमाच्या व्यामिश्र धूसरतेतही निर्णायक मानव्यभावाला कायम केंद्रस्थानी ठेवणारी अनुराधाबाईंची कविता सर्व प्रकारचे 'इझम' ओलांडून मानवी हक्कांच्या अटीतटीच्या लढाईत आरंभापासून अखेरपर्यंत माणूसपणाची अंतस्थ जाणीव कोरून ठेवण्यात यशस्वी ठरते.
     'सहोदर' आणि 'वारसा' या दोन उत्कृष्ट कविता व्यक्तिगत भावसंवेदन व्यक्त करणाऱ्या असल्या तरी त्यात वाचणाऱ्या प्रत्येकाच्याच जगण्यामागचा काळोख आणि अभावाच्या मूक भाषेला शब्दस्थ करण्याची ताकद आहे.
"उशाला चंद्रसूर्य घेऊन / झोपणारांच्या जगात / आपण उपरे होतो नेहमीच / आपल्याजवळ होतं सहोदर असण्याचं एकमेव पांघरूण"
आणि,
"आज आई आणि पूर्वज / दोघंही नाहीत माझ्या आसपास / पण तुटता तुटत नाही / त्यांनी बोटाला बांधलेला / वारशाचा धागा / जगण्यामागचा काळोख ओलांडताना"
या ओळी वाचणाराचे काळीज पिळवटून टाकतात.
मौखिक परंपरेतील लयबद्धता आणि शब्दकळेचा देशी डौल या कवितांचे जिव्हार संप्रेषण घडवून आणतात.
         खरंतर 'साहित्य अकादेमी' पुरस्कार मिळाल्यानंतर लगतच्या काळातच प्रकाशित झालेला हा संग्रह. यातील बव्हंशी कविताही याच नजिकच्या काळात लिहिलेल्या. सहसा असा मानाचा पुरस्कार मिळाल्यानंतर पुरस्कारप्राप्त लेखकाची आगामी वाङ्मयीन गुणवत्ता चढत्या आलेखाच्या रूपातच असेल हे सांगणे तसे खात्रीशीर नसतेच. कारण पुरस्कार मिळाल्यानंतरच्या लेखन अपेक्षांचा बाह्यदबाव, पुरस्काराने आतवर रुजलेली स्व-प्रतिष्ठेची भावना अथवा कधीकधी आत्मप्रौढी, यानंतरच्या लेखनावर नवनवीन प्रयोग करण्याचा फाजिल उत्साह, मार्केट समोर ठेऊन आखलेले करिअरबाज मनसुबे अशा अनेक कारणांमुळे अकादेमी मिळाल्यानंतर प्रसवलेले लेखन हे त्याच लेखकाच्या पूर्वीच्या लेखनापेक्षा निकृष्ट व टाकाऊ निपजल्याची अनेक उदाहरणे मराठीत आहेत. परंतु एकदा ठरावीक उंची गाठली की त्या कलावंताच्या कोणत्याही, कितीही टाकाऊ कलाकृतीबद्दल नकारात्मक टिकाटिप्पणी करणे गैर असते अशा भाबड्या प्रचलित समजुतीतून निम्न दर्जाची लेखनकृतीही सहर्ष खपवून घेतली जाते व त्याबाबत कोणतीच रोखठोक समीक्षा झालेली दिसत नाही.
या पार्श्‍वभूमीवर अनुराधा पाटील यांची अकादेमी पुरस्कारोत्तर कविता उलट अधिक लक्षणीय, अंगुळभर जास्तच उंचीची काव्य-गुणवत्ता घेऊन आविष्कृत होताना दिसते. 'सेलिब्रेटी मोड' वर कधीच न गेलेली ही साधीसुधी अभिजात कवयित्री. मेकअप आणि मुखवट्यांच्या जगात कायम दोन्ही खांद्यावरून पदर गच्च लपेटून असलेली, कोणत्याच मेकअप शिवायची ओळींच्या विटेवर उभी असलेली ही साक्षात रुखमाय !
मराठी भाषा जिवंत आहे तोवर ती तशीच भक्कम रोवून भाषेवर अनभिषिक्त हुकमत गाजवत आश्वासकपणे उभी असेल यात शंका नाही. संग्रहाचे शीर्षक काहीही असले तरी, या कवितेच्या वह्या कधीच बुडीत खाती निघणे शक्य नाही हे मात्र नक्की !

सुचिता खल्लाळ, नांदेड
चलभाष:९४२३०४४५००
email: suchitakhallal@gmail.com

Comments

Popular Posts