आठ सप्टेंबर
। दिक्कालातून ।
मला आठवत नाहीय नेमकं
ज्वराच्या भरात बरळणारा
मरणशय्येवरचा
हा क्षीण रोगी
किती काळापासून माझा बाप आहे
देवासारखा उभा नव्हताच तसा तो कधी
प्रेतासारखा आडवा पडून
फिरवतोय माझा ओलसर तळवा
त्याच्या चेहऱ्यावरून
तेव्हा लेकीत माय अनुभवायची असेल
म्हणून मीही थोपटत राहते त्याचा माथा
नंतर
बावळल्यासारखा तो बरळत राहतो
कितीतरी असंबद्ध गोष्टी
स्थळ काळ मितीची सरमिसळ करून
विजोड घटनांचे तुकडे गुंफत
सांगत राहतो एक नवीच कथा
जी खरंतर कधीच घडलेली नसते
काळाच्या क्षीण कड्या उसन्या ताकदीने गोवताना
गूढ रहस्यं उकलावीत तसे विचित्र चमकतात
त्याचे उजेड मेलेले रिक्त डोळे
तेव्हा पहिल्यांदाच जवळून जाणवतं मला की
आपल्याही डोळ्यांचा रंग तसाच गडद बदामी आहे
संकीर्ण ढगासारख्या तुकड्यातुकड्यात तरंगत्या गोष्टींची दाटीवाटी
त्याच्या अर्धपारदर्शी बुब्बुळातल्या धुरकट तवंगावर
कदाचित
त्याच्या सूर्य मेलेल्या डोळ्यांना पुरती जाणीव झालीय की
या जर्जर संध्याकाळी लांबलचक झाल्यायंत सावल्या
आणि उठून गेलीय गजबज जत्रा
आटपत आलंय एक युग
तरी तो
बांधू पाहतोय एक महाल
ढासळलेल्या जुन्या विटा रचून
बापा,
तुला नव्यानं रचायचं आहे का तुझं चरित्रं
परिशिष्टातल्या अंधारात जपलेल्या
मनासारख्या माणसांचे मनासारख्या घटितांचे
अदृश्य ठिपके जोडून रेखायचंय का कुठलसं मनातलं चित्र
किती अखंड बरळतोयंस तू मनातल्या दुहीविषयी
तक्रारींचे घोळके माणसांचे आयुष्याचे
दुःखाचं काळंनिळं बीळ
किती खोलवर उतरलंय तुझ्याआत
कॅन्सरग्रस्त पेशींपर्यंत भळभळत वाहून
नंतर अनियमित आकारात साचत मांसल होत जाणारं
वेदनेची वारुळं अंगावर वागवून उबगून गेलायंस का तू
नेमकं काय उचकटून फेकायचंय तुला
चित्रं?
चरित्रं?
रोगट पेशी ?
की जनुकं?
बापा,
नाही उचकटता फेकता येत काहीच
अगदी काहीच
अगोदरपासूनच पेरून ठेवलेली असते नियती बियात
तुझ्या बापानं तुझ्यात
तशी माझ्या बापानं माझ्यात
उडून जातात गिरकीवर
पानं फुलं पाखरं
आणि मग दिक्कालातून चालत येते आपल्या रिक्त जिभेवर
जननबोधाची मरणबोधाची
एक अनाकलनीय वाचा
ऐक,
जी तू बरळतोयंस
तसाच बरळला होता तुझा बाप
त्याचा बाप
आणि त्याचाही बाप...
••••••••••••••••••••••••••
। बाप मरण्याच्या पूर्वसंध्येला ।
मुसक्या बांधून अडगळीत फेकला तरी
डोकावतोच
कुठून कुठून
आपल्यातला लोचट कवी
थेट गळ्यात अडकतो उभाआडवा
जन्मारंभाचं आणि जन्माबाहेरचं तुडुंब काहीतरी
जे मांडायचं नाहीच आपल्याला ओळीत
तरी
नाइलाज नाइलाज होतोय आपला
हाकल हाकल हाकलल्या तरी
घोंघावतायत कीटकांसारख्या
ओळीच ओळी थव्याथव्यांनी
बाप मरण्याच्या पूर्वसंध्येला
आयसीयूत येरझारा करताना
प्रयत्न करूनही थांबवू शकत नाहीत आपण
आपल्यातल्या
शब्दजुळवू जळवा
....खरंतर
आपल्यातलं कवीपण
हा भुरटेपणाय आपला !
••••••••••••••••••••••••••••
। कच्ची सामग्री ।
आयसीयूत
अखेरची घरघर लागलेल्या बापाशेजारी
रात्र जागवताना
तो कसा मरतो ते
अधाशीपणे टिपतोय आपल्यातला
उचलेगीर लेखनिक
फिकटपिवळा पडत चाललेला
त्याचा म्लान देह
पायापासून मेंदूकडे बर्फाहून अतिथंड
होत चाललेला एकेक अवयव
स्क्रिनवरच्या इसीजीच्या रेघांचे अचानकच एकरेषीय होत जाणारे कर्व्ह
जन्मदात्याच्या मरणाची कच्ची सामग्री वापरून
मसालेदार प्रतिमांनी कविता सजवू पाहणारे प्रातिभिक लेखक आपण
बापा,
तू अंगाखांद्यावर खेळवलीस ही भाषा
आज तुझा उच्चार मुका होताना
माझ्या जिभेवर टपटप उमटतोय
त्या लिपीचा
थांबव हा अंमगळ सोहळा
मरणाची कच्ची सामग्री घेऊन
निपजू पाहणारी
बुडो
माझी हरेक कविता
....पुन्हा कधीच न तरण्यासाठी
••••••••••••••••••••••••••••••••••••
। तू गेल्यानंतर ।
तू गेल्यानंतर
काहीच तर ठीक नाहीय
या विषण्ण उदास छायाप्रकाशात
तेव्हापासून
कितीक झाडं हद्दपार झाली आपल्या मूळ मुलखातून
भुई हिसकावलेली आभाळ पारखी झालेली
झाडं
रोज दाटीवाटीनं उगवून येतात अरण्य होऊन आतल्या गाभाऱ्यात
आणि
तिथे तर तू उभा असतोस
विठ्ठलासारखा रोवून
भूमिकाहीन
तरी
साक्षेपी
माझी उन्हं मी झेलत आलेय
माझे हिशोब मी चुकते करत आलेय
रापतराबत चुकतमाकत
तक्रार एवढीचंय की
जाताना
तू काहीच बोलला नाहीस
सांगितलं नाहीस काहीच
माझ्याशी माझ्याविषयी
बंद पडून राहिलास रोवलेला
चिमण्या उडून जातात तरी झाड उभं असतं जागच्याजागी
पण तू तर जाताना हेही सांगितलं नाहीस
की
झाड उठून गेल्यावर
काय करायचं असतं चिमण्यांनी ?
•••••••••••••••••••••••••••••••••••••••
🌴 वडिलांचं जाणं आणि आपलं कवी असणं

तारखेनुसार एक वर्ष झालं वडील जाऊन.
काही कविता लिहिलेल्या त्यांच्या जाण्याआधी,
काही कविता लिहिलेल्या त्यांच्या जाण्याआधी,
ते गेल्यानंतर...
आपण आपल्या आयुष्यातल्या कमीअधिक महत्त्वाच्या कोणत्याही घटनेबद्दल अथवा सुखदुःखाबद्दल माणूस म्हणून रिॲक्ट होत असतो की कवी म्हणून ? माणूस म्हणून रिॲक्ट होताना त्यात कवी म्हणून रिॲक्ट होणं सामावलेलं असतं का? कवी म्हणून व्यक्त होताना आपल्यातलं समग्र माणूसपण त्यात दरवेळी अभिन्नपणे असतं का ?
की मग काही गोष्टी रिॲक्ट होण्यापलीकडच्या असतात ?
कशाचीतरी, कशाचीही 'कच्ची सामग्री' म्हणून वापर करायची सवय लागते का लेखकाला? ही सवय चांगली की वाईट ? मला ठाऊक नाही, मला निश्चित करता येत नाहीय. मग मी गप्प गप्प होत जाते. स्वतःला म्यूट करणं बरं वाटू लागतं. कवी म्हणून आणि माणूस म्हणूनही.
....मला हेही ठाऊक नसतं की, असं होत जाणं बरंय की बरं नाही !

.jpg)
सघन लेखन शब्दधनात तुमचं मुक्त मन
ReplyDelete