मृगजळाचे बांधकाम
भ्रम तर आहे सगळा.
शब्दांचा, सहसंबंधांचा, अस्तित्वाचा केवळ भ्रम!
हे विश्व आणि विशाल अवकाश केवळ भ्रमाचा अस्ताव्यस्त पसारा तर आहे. हा भव्य भवताल मांडून ठेवलाय ज्या रचनेत ती एक जटिल सांकेतिक व्यवस्था आहे. आणि आपण आहोत फक्त भाष्यकार! उकल करत जातो एकेका संकेत रचनेची. लावू पाहतो आपल्याला हवा तसा अर्थ शब्दांचा, सहसंबंधांचा किंवा अस्तित्वाचा. व्यक्ती बदलला की अर्थ बदलेल. जितक्या व्यक्ती तितकी वेगवेगळी इंटरप्रिटेशन्स... तर मग सर्वात अचूक अर्थ कोणता? सर्वात योग्य आणि सत्यनिष्ठ इंटरप्रिटेशन कायय?
तर याबद्दल अस्तित्वात नाहीय कोणतीच प्रमाण अशी आदर्श उत्तरपत्रिका. कारण भ्रमंय सगळा... जे जे प्रमाण ते ते भ्रम... जे जे आदर्श ते ते भ्रमच...!
सत्य हुडकत जातो आपण म्हणजे अनेक भ्रम तर जोडत नेतो एकमेकांना ठिगळं लावून. सत्याची महाकाय उभारणी आणि आदर्शाच्या नजाकतीची साजूक कलाबुतं, ही फक्त भ्रमाची प्रमाणबद्ध तुरुंगं तर आहेत! थुकरट तत्त्वज्ञानाची जाडजूड महावाक्ये आणि पदरगाठीच्या पुरचुंडीला सोयीनुसार बांधून घेतलेलं गाठभर आध्यात्म ही तर भ्रमाची आत्यंतिक निसरडी रूपं...
तैलबुद्धीच्या युक्तिवादावर वाहत्या वाऱ्याचे प्रवाह हेरून मतलबी झोके घेत, प्रौढ दार्शनिकाचा आव आणत त्यांनी सांगू पाहिली काहीएक प्रमाणवाक्ये. वक्तृत्वबाज शैलीत व्यासपीठं ताब्यात घेत पुन्हा पुन्हा करून घेतली भ्रमाची भंपक जाहिरात. आतषबाजीच्या फुलझड्या उडवत खालमान्या समूहासमोर ऐरणीवर घाव घालावे तसे ठोकून ठोकून फिट्ट बसवत राहिले भ्रमाचे हवे तसे आकार, हव्या त्या आकारात. शिळ्या मिक्सव्हेज मसाला फ्रायला पुन्हा नवा तडका, नव्या आगीवर. तुर्रेबाज शैलीत त्यांनी अंगुलीनिर्देशित केली तर्जनी त्या दिशेच्या रोखानं वळवल्या समूहाने माना. ते म्हणाले हे सत्य आहे; माना डोलवत अनुयायी म्हणाले होय बा... ते म्हणाले हे आदर्शवत आहे; माना डोलवत अनुयायी म्हणाले होय बा... ते म्हणाले; हे उन्हात चकाकतं वाळवंट गोड्या पाण्याचं तळं आहे... अनुयायी पुन्हा एकरवाने उच्चारले होय बा... होय होय बा...
होयबा होयबाच्या गजरात लवकरच अनुयायी घेतील पटापट उड्या वाळवंटी मृगजळात...
भ्रम जेव्हा समोरच्या माणसाच्या मनात आणि मेंदूत हवा तसा तासून-ठोकून बसवता येतो तेव्हा भ्रमाचे तुरुंग तयार होतात. आणि तेच तुरुंग निर्देशित केले जातात अंतिम सत्य म्हणून अथवा युगानुयुगांचे आदर्श म्हणून.
अशा तुरुंगात स्वतःला बंदिस्त करून घेणारे म्हणवले जातात सत्याचे अनुयायी आणि आदर्शाचे भक्त !
खरंतर , या व्याख्या म्हणजे सुद्धा भ्रमच!

.jpg)
खूप छान लिहीलस तुझ्या लेखनास शुभेच्छा
ReplyDelete